Tuesday, December 25, 2018

चौथे ट्विटर मराठी भाषा संमेलन २०१९ :: ११ ते १३ जानेवारी २०१९

" प्रकट व्हा, अभिव्यक्त व्हा !! "

ट्विटर हे एक जागतिक व्यासपीठ आहे.ह्या व्यासपीठावर रोज करोडो लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवत असतात.एकेकाळी फक्त इंग्रजी भाषेचा बोलबाला असणारे ट्विटर आज जगातील प्रत्येक लिपी असणारी भाषा सामावून घेत आहे.मग अशा ह्या ट्विटरवर मराठीचे अस्तित्व किती आहे ? असा तुम्हाला प्रश्न पडेल.सध्या मराठीचे ट्विटरविश्व जोमाने विस्तारत आहे व त्याचे भविष्य उज्जवल आहे. मराठीचे ट्विटरविश्व अधिकाधिक फुलावे आणी मराठीत रोज भरपूर ट्विट्स लिहल्या जाव्यात ह्या ध्येयातूनच #ट्विटरसंमेलन ह्या कल्पनेचा जन्म झाला.

यंदाचे #ट्विटरसंमेलन आम्ही ११,१२,१३ जानेवारी २०१९ रोजी भरवणार आहोत. तीन दिवस वेगवेगळ्या हॅश टॅगचा वापर करून आपण ह्यात सहभागी होऊ शकता.संमेलनाबद्दल माहितीसाठी @MarathiWord ट्विटरखात्याशी संलग्न व्हावे.

आता आपण ट्विटर संमेलनाची थोडी ओळख करून घेऊया. संमेलनाचा मुख्य हॅशटॅग असेल #ट्विटरसंमेलन आणि सोबत असतील
"बारा हॅशटॅग मित्र".व्यक्त होण्यासाठी वेगवेगळे विषय निवडूण त्याचे हॅशटॅग केले आहेत.थोडक्यात तुम्हाला ट्विट करताना दोन हॅश टॅग वापरायचे आहेत,मुख्य हॅशटॅग #ट्विटरसंमेलन आणि सोबत बारा हॅश टॅग पैकी एक हॅशटॅग.

ओळख "बारा हॅश टॅग मित्रांची " :

#माझीकविता :

तुम्ही कविता करता ? ती कविता हजारो लोकांनी वाचावी असे तुम्हाला वाटते ? उत्तर हो असेल तर वापरा #माझीकविता. तुम्हाला आवडलेल्या इतर कविता #माझीकविता वापरून तुम्ही ट्विट करू शकता.कविता मोठी असेल तर ती कागदावर लिहुन किंवा मोबाईलवर टंकित करून त्याचे छायाचित्र काढून ट्विटावे.मागील संमेलनातील निवडक कवितांचे इबुक तयार करण्यात आले होते, यंदाही तो प्रयत्न राहिल.

#ट्विटकथा :

चला ट्विटरवर मराठी कथा लिहूया शंभर ट्विट्स मध्ये.फक्त शंभर ट्विट्स मध्ये तुम्हाला लिहायची आहे एक कथा वापरून  #ट्विटकथा .तुम्ही एखादी दिर्घ कथा सुद्धा आपल्या ब्लाॅगवर लिहून #ट्विटकथा वापरून दुवा ट्विट करू शकता.

#माझाब्लाॅग :

तुम्ही लिहलेल्या ब्लाॅग बद्दल चर्चा #माझाब्लाॅग वापरून करू शकता. ब्लाॅगचा दुवा देऊन ट्विटमध्ये ब्लाॅग बद्दल थोडक्यात माहिती लिहावी.

#माझीबोली :

महाराष्ट्रात आपण जरी मराठी बोलत असलो,तरी राज्यातील प्रत्येक भागात मराठीच्या वेगवेगळ्या बोली प्रचलित आहेत.प्रत्येक बोलीत प्रचंड समृद्ध असे ज्ञान भांडार आहे. ह्या बोली डीजीटल युगात टिकल्या पाहिजेत असे आम्हाला वाटते.त्या बोलीने वर्षानुवर्षे सांभाळून ठेवलेले ज्ञान जगासमोर येणे गरजेचे आहे.
म्हणुन #माझीबोली वापरून आपण आपल्याला माहित असलेल्या बोलींबद्दल ट्विट करू शकता. बोलीतील शब्द,गाणी,म्हणी,अभंग,ओवी,काव्य आणि तिचे स्वतःचे असे व्याकरण इतर मराठी माणसांना समजावून सांगु शकता.

#साहित्यसंमेलन :

यवतमाळ साहित्य संमेलनात व्यक्त झालेल्या विचारांवर ,इतर घडामोडींवर आणि अध्यक्षीय भाषणावर आपण आपले मत #साहित्यसंमेलन वापरून नोंदवू शकता.

#वाचनीय :

तुम्हाला कुठले पुस्तक आवडले ? सध्या तुम्ही काय वाचत आहात ? कुठले लेखक/लेखिका तुम्हाला विशेष आवडतात?.तुमच्या वाचन प्रेमाबद्दल आम्हाला जाणुन घ्यायला आवडेल.समृद्ध अशा मराठी साहित्याबद्दल #वाचनीय वापरून तुम्ही चर्चा करू शकता.

#हायटेकमराठी :

मराठीच्या कक्षा आता रूंदावत आहेत.आता मराठी संगणकावर दिसते,मोबाईलवर दिसते ,परंतु मराठीसाठी तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी मराठी तयार करण्यासाठी अजुनही कल्पक प्रयत्नांची गरज आहे.मराठीला हायटेक आणि डिजिटल माध्यमांवर सुपरहिट बनवण्यासाठी तुमच्या डोक्यातील कल्पना तुम्ही  #हायटेकमराठी वापरून ट्विट करू शकता.मराठी संकेतस्थळ,अॅप्स, फाॅन्ट्स बद्दल माहिती तुम्ही #हायटेकमराठी वापरून देऊ शकता.

#बोलतोमराठी :

आपण जाल तिथे मराठी बोलता का ? तुमचे अर्थ आणि सामाजिक व्यवहार मराठीत करता का ? तुम्हाला
 कुठल्या अडचणी येतात ? महाराष्ट्रात मराठीचा वापर वाढावा यासाठी काय करायला हवं ? .तुम्ही प्रतिकूल वातावरणातही मराठी आवर्जुन वापरली त्याचे किस्से आणि वरील प्रश्नांवर चर्चा तुम्ही #बोलतोमराठी वापरून करू शकता.

#मराठीशाळा :

मराठी शाळांसंबंधीच्या सर्व प्रश्नांची #मराठीशाळा वापरून आपण चर्चा करू शकता.आपल्या भागांतील यशस्वीपणे चालणा-या मराठी शाळांची ओळख आम्हाला करून देऊ शकता.मराठी शाळेत शिकून आज विविध ज्ञानशाखांमध्ये यश मिळवलेल्या व्यक्तींची ओळख करून देऊ शकता.मराठी शाळेत शिकताना तुम्हाला आलेले अनुभव आणि आठवणी आपण #मराठीशाळा वापरून ट्विट करू शकता.

#भटकंती :

तुम्ही महाराष्ट्रातील कानाकोप-यात असणा-या गडकिल्ले,मंदिरे,जंगले,डोंगरद-यां बद्दल चर्चा #भटकंती वापरून करू शकता.आपल्या भागातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती देऊ शकता.#भटकंती प्रवासाची आवड असणा-या पावलांच्या अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ आहे.

#खमंग :

खवैयांसाठी हे खास हॅशटॅग.महाराष्ट्र आणि जगात इतर कुठेही बनवल्या जाणा-या स्वादिष्ट पाककृतींची चर्चा आपण #खमंग वापरून करू शकता.आपण पदार्थ
आणि तो बनवण्याची कृती कागदावर किंवा मोबाईल मध्ये मराठीत लिहून, त्याचे छायाचित्र काढून ट्विट करायचे आहे.

#माझेवेड :

तुम्हाला कसले वेड आहे ? तुमचे पॅशन काय आहे ?
तुमच्या पॅशन बद्दल तुम्ही #माझेवेड वापरून चर्चा करू शकता.तुम्ही काढलेले छायाचित्र,रांगोळी,चित्र आम्हाला ट्विट करू शकता.तुम्ही एखादे गायलेले गाणे ट्विट करू शकता. तुम्हाला आवडणाऱ्या खेळा बद्दल आणि क्रिडापट्टू बद्दल ट्विट करू शकता.मन रमवण्यासाठी तुम्ही निवडलेल्या छंदाविषयी व्यक्त होण्यासाठी #माझेवेड हे व्यासपीठ आहे.

आभार,
आयोजक ट्विटर खाते : @MarathiWord
संपर्क पत्ता : swapshingote@gmail.com